खरीप पूर्व मशागतीस वेग; कन्नडमध्ये ट्रॅक्टर मशागतीला इंधनाने खोडा

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : गत वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसाने सरासरी ओलांडल्याने चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिसून आला नाही. पारंपरिक बैलशेतीला फाटा देऊन यंत्रचलीत शेतीवर भर असल्याने एप्रिलपासून इंधन तुटवडा नसल्याने शेतकरी शेतीकामासाठी बिनधास्त होता.

 मे महिन्याच्या दुसन्या आठवड्यापासून इंधन तुटवडा व इंधनाचे वाढलेले दर यांमुळे शेती मशागतीचे दर वाढले आहेत. मिश्र खताच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत खते उपलब्ध होणार की नाही या विषयी साशंकता आहे. अशाही परिस्थितीत कन्नड तालुक्यातील अपेक्षित हेक्टरी लागवड मका ४५ हजार हेक्टर, कापूस ४० हजार हेक्टर, सोयाबीन पान हजार हेक्टर, तूर चार हजार हेक्टर, बाजरी एक हजार हेक्टर, मूग एक हजार, उडीद १०० हेक्टर, भूईमूग एक हजार हेक्टर, अद्रक (आले) सुमारे साडेचार हजार हेक्टर तर ऊस साडेसात हजार हेक्टर अशी आहे. तालुक्यातील शेतकरी मान्सूनपूर्व पावसाच्या मशागतीमध्ये गुंतला आहे. 

उन्हाळी कांदा, मका व बाजरी पिकाच्या काढणीपश्चात आगामी खरीप पिकांमध्ये कापूस व मका पिकांसाठी मशागत सुरू आहे, तर अद्रक पिकासाठी गादीवाफे तयार करणे, शेणखत, जैविक खते टाकण्याच्या खरीपपूर्व मशागतीकडे वळला आहे. ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. कापूस पिकास मार्च व एप्रिल महिन्यात भाव मिळूनही यंदा क्षेत्र जैसे थे राहणार आहे. मका पिकाचे ढासळलेल्या भावामुळे पिकाच्या क्षेत्रात घट दिसून येत आहे. 

सिंचनाच्या ठिकाणी ऊस पिकाकडे कल वाढला आहे. ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होताना दिसून येत आहे. या पिकांबरोबर पूरक व नगद पीक म्हणून अद्रकचे क्षेत्र तालुक्यात वाढणार आहे. शेतकरी डाळवर्गीय पिकाकडे जोडपीक म्हणून पाहत आहेत. यामुळे तूर पिकाकडे कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कन्नड तालुक्यातील लागवडीयोग्य क्षेत्र ९१ हजार २०० हेक्टर आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत. यासाठी फार्मर आयडी व सातबारा उतारा गरजेचा आहे.